डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन 10 जूनला


नवनीती न्यूज

यवतमाळ, दि.9 (जिमाका) : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्रतिवर्षी 10 जुन हा दिवस डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

दृष्टीदिन दिवशी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करुन त्याद्वारे सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते. डॉ.भालचंद्र यांचे संपूर्ण नाव डॉ.रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र असे होते. त्यांचा जन्म दि.10 जुन 1926 ला झाला आणि त्यांचा मृत्यु दि.10 जून 1971 रोजी झाला. योगायोगाने त्यांचा जन्म आणि मुत्युदिन एकच आहे. भालचंद्र हे प्रख्यात नेत्रशल्य चिकित्सक होते. त्यांच्या जीवन कालावधीत कुठलीही आधुनिक सोयीसुविधा नसतांना अंधत्व निर्मुलन कार्य करुन हजारो यशस्वी मोतिबिंदु शस्त्रक्रिया केल्या. त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दि. 10 जून ते 16 जुन हा डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह साजरा केला जातो.

Advertisement

 

शासकीय सेवेतील नेत्र शल्यचिकित्सक डॉ.रामचंद्र लक्ष्मणराव भालचंद्र यांनी अहोरात्र काम केले. खडतर परिस्थितीवर मात करुन त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर 80 हजाराहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करुन नेत्रहीनांचे जीवन प्रकाशमय केले. नेत्रदानासारख्या महान कार्याचे महत्व देखिल त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले. नेत्रदान हे अंध व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणतो. नेत्रदान करून अंधांना जीवन जगण्यासाठी नेत्र फार उपयोगी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे.

 

मरणोत्तर नेत्रदान केल्यास दोन अंध व्यक्तींना हे सुंदर जग पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येकाने नेत्रदान करणे आवश्यक आहे. एक वर्षावरील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करु शकते. एखाद्या व्यक्तीला चष्मा लागला असेल डोळ्यांचे ऑपरेशन झाले असेल, मोतिबिंदु शस्त्रक्रिया झालेली असेल, उच्च रक्तदाब व मधुमेह असणारे व्यक्ती सुद्धा नेत्रदान करु शकतात, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड तसेच जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ.मनोज तगडपल्लेवार यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!