छत्रपती शिवरायांच्या जीवनाचे दर्शन घडवणारे ‘शिवगर्जना’ महानाट्याचा अमरावतीकरांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी सौरभ कटियार


नवनीती न्यूज

            अमरावती, दि. 20 (जिमाका) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्भुत जीवन चरित्राला प्रत्यक्ष डोळ्याने बघण्याची संधी अमरावतीकरांना आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह तीन दिवसीय या महानाटकाला उपस्थित राहून नव्या पिढीला शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्र अनुभवण्याची संधी द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.

           राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. कटियार यांच्या अध्यक्षतेखाली आज महसूल भवन येथे महानाटयाच्या आयोजनाबाबत बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकार अधिकारी संतोष जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, शिक्षणाधिकारी बुद्धभुषण सोनोने, तहसिलदार विजय लोखंडे, शिवगर्जना महानाट्याचे दिग्दर्शक स्वप्नील यादव आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

          राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व अमरावती जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवगर्जना महानाट्य प्रयोगाचे सादरीकरण होत आहे. या महानाट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची, नितीची, चरित्राची, विचारांची व कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करुन तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली व अलौकिक वारशाला प्रसिद्धी मिळावी, या उद्देशाने महाराजांच्या जीवनावर आधारित महानाटयाचे सादरीकरण संभाव्य दि. 24, 25 व 26 मे 2024 रोजी सायन्स स्कोर मैदान येथे विनामूल्य करण्यात येणार आहे.

          आजवर या महानाट्याने संपूर्ण भारतात हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत 110 प्रयोग यशस्वीरित्या सादर केले आहेत  . भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीतही  हे महानाट्य सादर झाले आहे. या महानाट्यात 250 कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर होणार आहे. तर 140 फूट लांब आणि 60 फूट उंच असे भव्य दिव्य नेपथ्य असणार आहे. तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातली आहे. 12 व्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत  आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास मांडण्यात आला आहे. तरी सर्व नागरिकांनी या अविस्मरणीय महानाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!