76 लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त


जिल्हा प्रशासन व कृषी विभाग ॲक्शन मोडवर

नवनीती न्यूज

चंद्रपूर, दि. 17 : जिल्ह्यात खरीप हंगाम 2024-25 ला सुरवात झाली असून शेतक-यांना अधिकृत बियाणे मिळावे, तसेच जिल्ह्यात अनधिकृत बियाणांची साठवणूक, विक्री व शेतक-यांची फसवणूक होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग आणि कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. याच अनुषंगाने पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी येथे भरारी पथकाने धाड टाकून अनधिकृत कापसाचे 39.88 क्विंटल बियाणे (किंमत 76 लक्ष 57 हजार रुपये) जप्त केले.

 

भिमनी (ता. पोंभुर्णा) येथील नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील पक्क्या घरात संशयास्पद अनधिकृत कापूस बियाणे असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर भरारी पथकाच्या माध्यमातून 76 लक्ष 57 लक्ष रुपये किंमतीचे 39.88 क्विंटल अनधिकृत कापसाचे बियाणे पकडण्यात आले आहे. सदर कार्यवाही जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार, कृषी विकास अधिकारी विरेंद्र राजपूत,  उपसंचालक चंद्रकांत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Advertisement

 

जिल्ह्यातील शेतक-यांसाठी परवानाधारक कृषी केंद्रात कपाशीचे बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या केंद्रातूनच शेतक-यांनी अधिकृत बियाणे खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच शेजारील तेलंगणा राज्यातून अनधिकृत बियाणांची वाहतूक, विक्री व साठवणूक रोखण्याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी कृषी विभागाला निर्देश देण्यात आलेत. याबाबत कृषी विभागाकडून दैनंदिन माहिती मागविण्यात येत आहे. तसेच अनधिकृत बियाणांबाबत जिल्हा प्रशासन अतिशय सक्त असून जिल्हाधिका-यांची यावर करडी नजर आहे.

 

भिमनी येथील अनधिकृत संशयित कापूस बियाण्याचा साठा इतरत्र परिसरात कुठेही विक्री केला आहे काय? यावर कृषी विभाग व पोलीस विभागातर्फे तपास सुरू आहे. अनधिकृत कापूस बियाणांवर कुठल्याही प्रकारचे लेबल क्लेम नसतात. असे बियाणे पेरणी करिता वापरू नये.  तसेच अनधिकृत कापूस बियाणे कुणीही विक्री करत असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.

 

सदर कारवाई तंत्र अधिकारी गुणनियंत्रण चंद्रशेखर कोल्हे, मोहीम अधिकारी लंकेश कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोढे, कृषी अधिकारी महेंद्र डाखरे, विवेक उमरे, पोंभुर्णाचे तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, कृषी अधिकारी  नितीन ढवस, श्री. काटेखाये, श्री. कोसरे, श्री. जुमनाके, श्री. आत्राम व तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोंभुर्णा यांच्या चमुने केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!