आदिवासी युवकांचे सक्षमीकरण : बांबू उद्योजकतेतील करिअर


एक वर्षीय बांबू उद्योजकता व रचना पदविका अभ्यासक्रम

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामध्ये प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

नावनीती न्यूज

गडचिरोली, दि. 05 : गोंडवाना विद्यापीठातंर्गत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता “बांबू एंटरप्रेन्योरशिप आणि डिझाइन”(बांबू उद्योजकता व रचना) या एक वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी बुधवार, (दि.05 जून) पासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे. जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परिक्षेत्रातील प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांनी केंद्रामध्ये प्रत्यक्ष येऊन आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशीस घराई यांनी केले आहे.

 

गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राने आदिवासी आणि ग्रामीण तरुणांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने एक नाविन्यपूर्ण “बांबू एंटरप्रेन्योरशिप आणि डिझाइन” (बांबू उद्योजकता व रचना) डिप्लोमा अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभिनव अभ्यासक्रम बांबू क्षेत्रात शाश्वत करिअर घडविण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान प्रदान करत असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी निर्माण करतो. बांबू उद्योगाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

Advertisement

अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील तज्ञांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक, प्रत्यक्ष शिकण्याच्या अनुभवांचा आणि उद्योगांच्या प्रदर्शनाचा फायदा होईल. या अभ्यासक्रमामध्ये बांबू संशोधन आणि विकासासाठी अत्याधुनिक सुविधा देखील उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे, विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे बांबू-आधारित व्यवसाय सुरू करण्यात मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांने इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. अशा 18 ते 40 वर्ष वयोगटातील युवक-युवती अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. सदर कार्यक्रम बांबू क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच रोजगार मिळेपर्यंत मदत करीत राहणार आहे.

 

ही अनोखी शैक्षणिक संधी आदिवासी तरुणांना केवळ शाश्वत उपजीविकेचे आश्वासन देत नसून पारंपारिक ज्ञान आणि कौशल्यांचे जतन तसेच प्रगत देखील करते. विद्यार्थी, बांबूमध्ये करिअर घडवण्याच्या या संधीचा स्वीकार करून, आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय समतोल राखण्यास हातभार लावू शकतात, त्यांच्या आकांक्षा प्रत्यक्षात आणत बांबू उद्योगात अग्रणी बनू शकतात.

प्रवेशासंबधी तसेच अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीकरीता विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे अभ्यासक्रम समन्वयक शुभम गोड्डे (7588762148) यांच्याशी संपर्क साधावा. असे विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!