पशुधनाला इयर टॅगिंग करण्याचे आवाहन


नवनीती न्यूज

चंद्रपूर, दि. 2 : राज्यातील सर्व पशुंना टॅगिंग करून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर घेणे बंधनकारक करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. सदरील शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व पशुपालक, शेतक-यांकडे असलेल्या सर्व पशुधनाच्या कानात इअर टॅगिंग करून त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक आहे.

तसेच दिनांक 1 जून 2024 नंतर इअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी व विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय खरेदी विक्री करता येणार नाही. तसेच पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा दिली जाणार नाही. जाणीवपूर्वक नष्ट केलेल्या पशुधनाची इअर टॅगिंग व त्याची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून देय असलेले अर्थिक सहाय्य मिळणार नाही. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशुंच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम मिळणार नाही. पशुधनाची वाहतुक इअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही. तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतुकदार यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

Advertisement

इअर टॅगिंग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावागावातील खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे इअर टॅगिंग नसलेले पशुधन बाजार समिती मध्ये आणले जाणार नाहीत व त्यांची खरेदी विक्री होणार नाही, याची दक्षता संबंधीत बाजार समितीने घ्यावी. पशुधनाच्या मालकी हस्तांतरण बाबतच्या नोंदी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरीत अद्यावत करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत पशुपालकाची राहील.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडे असलेल्या सर्व पशुधनास संबंधीत पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांशी संपर्क करुन इअर टॅगिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!